शेतकर्‍यांनी डी.ए.पी. ऐवजी संतुलित खतांचा वापर करावा : गणेश जैताडे

    दिनांक :29-May-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Agriculture Officer Ganesh Jaitade आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, विशेषतः डीएपी खतासाठी शेतकर्‍यांकडून मोठी गर्दी होत आहे. मात्र, केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) गणेश जैताडे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, बहुतांश शेतकरी पेरणीपूर्वी डीएपी खताला प्रथम पसंती देतात. परंतु पिकांच्या आवश्यकतेनुसार पर्यायी खतांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास डीएपीइतकाच चांगला परिणाम मिळू शकतो. ट्रिपल सुपर फॉस्फेट (टीएसपी), युरिया, युरिया फॉस्फेट, एनपीके मिश्र खते तसेच गंधकयुक्त खतांचा संतुलित वापर केल्यास पिकांना आवश्यक नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा प्रभावीपणे होतो. जैताडे यांनी सांगितले की, जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
Ganiesh
 
सतत एकाच खताचा अतिरेक केल्यास जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडते व दीर्घकालीन उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृदापरीक्षणाच्या अहवालानुसार खतांचा वापर करणे आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची अचूक माहिती मिळते आणि त्यानुसार खतांचा वापर केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो. विशेषतः सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या खरीप पिकांसाठी गंधक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांची वाढ खुंटणे, पानांचा पिवळेपणा आणि उत्पादनात घट होण्याची शयता असते. त्यामुळे गंधकयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.सध्या खरीप हंगाम जवळ आल्याने खतांच्या विक्री केंद्रांवर शेतकर्‍यांची गर्दी वाढत आहे. काही ठिकाणी डीएपी खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शयता लक्षात घेता कृषी विभागाने पर्यायी खतांविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शेतकर्‍यांनी अफवा किंवा चुकीच्या सल्ल्यावर विश्वास न ठेवता कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार खतांची खरेदी व वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे आणि खतांच्या पिशव्यांवरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख व किंमत तपासूनच खरेदी करावी, असेही जैताडे यांनी सांगितले.
 
 
Agriculture Officer Ganesh Jaitade  कोणत्याही प्रकारची जादा दराने विक्री, साठेबाजी किंवा सक्तीची टॅगिंग आढळल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कृषी तज्ज्ञांच्या मते, संतुलित खत व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास, जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास आणि दीर्घकालीन शाश्वत शेतीस चालना मिळण्यास मदत होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा स्वीकार करून वैज्ञानिक पद्धतीने खत व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी अधिकारी गणेश जैताडे यांनी केले आहे.