राजस्थान
Ajmer Scorpio Fire Case राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामपुरा गावात गुरुवारी सकाळी घडलेल्या जळत्या स्कॉर्पिओ प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुरुवातीला भीषण अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे आता धक्कादायक हत्याकांड असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अवघ्या काही तासांत वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत, मृत माजी सरपंचाच्या अल्पवयीन मुलासह पहिली पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतले आहे.
श्रीरामपुरा गावचे माजी सरपंच राम सिंह चौधरी यांनी 2005 मध्ये सुनीता यांच्याशी पहिले लग्न केले होते. त्यांना दोन मुले होती. मात्र 2019 मध्ये त्यांनी सुरज्ञान नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केल्याने कुटुंबात तणाव निर्माण झाला. दुसऱ्या लग्नानंतर पहिली पत्नी आणि तिच्या मुलांना घरात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. यावरून घरात सातत्याने वाद होत होते.पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, राम सिंह चौधरी दारूच्या नशेत पहिल्या पत्नीला मारहाण करत होते. आईवरील अत्याचार आणि घरातील सततचा अपमान यामुळे त्यांच्या 17 वर्षीय मुलाच्या मनात वडिलांविषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. या रागातूनच त्याने वडिलांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवला होता.
रात्रीच्या वादातून सकाळच्या ‘अपघातापर्यंत’
27 मे रोजी रात्री पुन्हा घरात वाद झाला. त्यानंतर रात्री उशिरा राम सिंह चौधरी झोपेत असताना अल्पवयीन मुलाने त्यांचा गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान जागी झालेल्या सावत्र आई सुरज्ञान देवी, आजी पूसी देवी आणि चुलत बहीण महिमा यांनाही आरोपीने ठार केल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारात आरोपी मुलाला त्याची आई आणि बहिणीने मदत केल्याचा पोलिसांचा दावा आहे.हत्याकांडानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोठा कट रचला. घरातील ट्रॅक्टरमधून डिझेल काढण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह ओढत नेऊन स्कॉर्पिओमध्ये ठेवण्यात आले. घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर गाडी नेऊन त्यावर डिझेल ओतून आग लावण्यात आली.गुरुवारी पहाटे गावाजवळील अराई रोड परिसरात धावत्या स्कॉर्पिओला आग लागल्याची माहिती समोर आली. काही क्षणांतच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गाडीत अडकलेल्या राम सिंह चौधरी, त्यांची पत्नी सुरज्ञान देवी आणि भाची महिमा यांचा जागीच जळून मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या पूसी देवी यांना बाहेर काढण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.सुरुवातीला ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झालेला अपघात मानली जात होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू करताच अनेक धक्कादायक पुरावे समोर आले.
फॉरेन्सिक तपासातून उघड झाले सत्य
फॉरेन्सिक टीमला जळालेल्या गाडीच्या Ajmer Scorpio Fire Case मागील सीट फोल्ड अवस्थेत आढळल्या. त्यामुळे मृतदेह जबरदस्तीने गाडीत कोंबण्यात आल्याचा संशय निर्माण झाला. सावत्र आईचा मृतदेह गाडीबाहेर रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने अपघाताऐवजी हत्येचा संशय अधिक बळावला.तपासादरम्यान घरातील भिंतींवर केमिकलने धुतलेले रक्ताचे डागही सापडले. ट्रॅक्टरमधून डिझेल काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच ज्या रस्त्यावर गाडी सापडली तो रुग्णालयाकडे जाणारा मार्ग नसल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. या सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांमुळे आरोपींचा बनाव उघडकीस आला.या प्रकरणी पोलिसांनी पहिली पत्नी, मुलगी आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. अजमेरमधील हे प्रकरण सध्या संपूर्ण राजस्थानात चर्चेचा विषय ठरले आहे.