कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रतीक्षेत; काजवे चमकायला लागलेत
*सावकाराच्या दारी जाण्याची वेळ
दिनांक :29-May-2026
Total Views |
सिंदीरेल्वे,
crop insurance the fireflies पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्यांना गतवर्षीच्या नुकसानाची भरपाई मिळाली नाही. परिणामी, नव्या हंगामाची जुळवाजुळव करताना बळीराजापुढे काजवे चमकत आहेत. यंदाच्या हंगामात विहित मुदतीत बँका कर्ज देण्यास कर्जमाफीचा सोक्षमोक्ष लागला नसल्याने कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे खासगी सावकाराच्या दारी जाण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या हंगामात निसर्गाने कहर केला. त्यात पीक विमा कंपनीने अत्यल्प रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करून शेतकर्यांची बोळवण केल्याची ओरड आहे. त्यामुळे ही योजनाच फसवी असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
या भागात गतवर्षी कापूस आणि सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अनेक शेतकर्यांनी पिकांचा विमा काढला होता. पण, सततचा पाऊस, अतिवृष्टी तसेच हवामानातील अचानक बदलामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन तर हातचे गेले होते. कापसाचे अत्यल्प उत्पन्न हाती लागले. विमा काढलेल्या शेतकर्यांना विम्याची परतावा रक्कम बर्यापैकी मिळेल ही आशा होती. परंतु, विमा कंपनीने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले. विमा काढण्यासाठी शेतकर्याने केलेला खर्च देखील निघाला नाही अशी चर्चा आहे.crop insurance the fireflies परिणामी, शेतकर्यात प्रचंड नाराजी आहे. येत्या खरीप हंगामात पिकांची निवड कशाच्या आधारे करावी व बी- बियाणे तसेच रासायनिक खते कशी घ्यावी? या विवंचनेत कास्तकार दिसून येत आहेत. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक कर्मचार्यांचा, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांचा संप त्यामुळे पैसा कोठून व कधी मिळेल सुचत नाही असे ९५ टक्के शेतकरी म्हणतात. नवीन हंगामासाठी बँक कधी उघडेल आणि किती व केव्हा कर्ज देईल! की पुन्हा सावकारांच्या विळख्यात बळीराजाला ढकलले जाईल सांगता येत नाही एवढे नक्की! संपलेल्या हंगामात कृषी विभागातर्फे ३५ पैसे आणेवारी आली असताना विमा कंपनीची विमा परताव्याची रक्कम का नाकारली हा सवाल अनेक शेतकरी जिल्हा प्रशासनाला विचारत आहे. दरम्यान, प्रशासन आणि विमा कंपनीने नुकसानग्रस्त भागाचे पुनर्मुल्यांकन करून तातडीने प्रलंबित विम्याची रक्कम वितरित करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.