मुंबई,
Biometric Attendance for College Students अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक होणार असून, उपस्थितीबाबत अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. अनेक विद्यार्थी केवळ नावापुरते महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि नियमित उपस्थित राहत नाहीत, तर काही विद्यार्थी कोचिंग क्लासेसला प्राधान्य देऊन महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे सातत्याने येत होती. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता बायोमेट्रिक प्रणालीसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही देखरेख ठेवली जाणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शिस्त निर्माण करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. काही विद्यार्थी पालकांच्या आणि शिक्षकांच्या माहितीशिवाय महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार शिक्षकांना केवळ हजेरी नोंदवण्याची जबाबदारीच नाही, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्याचेही काम करावे लागणार आहे. मुख्याध्यापकांवर संपूर्ण वर्गातील उपस्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राहणार आहे. दरम्यान, इयत्ता बारावीचे महाविद्यालये जून महिन्यात सुरू होणार असून अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम प्रभावीपणे लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयीन उपस्थिती वाढेल आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल अधिक वाढेल, असा शिक्षण विभागाचा विश्वास आहे.