आता सौंदडवासियांसाठी ‘जन्म-मृत्यू सहाय्य योजना’

    दिनांक :29-May-2026
Total Views |
- ग्रामसभेत ठराव मंजूर; अर्ज केल्यावर मिळणार आर्थिक मदत

गोंदिया, 
'Birth and Death Assistance Scheme' जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी असलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे शुक्रवारी 29 मे रोजी सरपंच हर्ष विनोद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक गुरुदेव व्यायाम मंदिर परिसरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावाच्या विकासासह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली असताना गावात ‘जन्म-मृत्यू सहाय्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेत तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्ज केल्यानंतर संबंधितांना ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
 
 
Saundad
 
ग्रामसभेच्या प्रारंभी मागील ग्रामसभेचे कार्यवृत्त वाचून त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन 2025-26 या आर्थिक वर्षाच्या वार्षिक जमा-खर्च पत्रकावर चर्चा करून मंजुरी प्रदान करण्यात आली. ग्रामस्थांना शासनाच्या विविध घरकुल योजनांची माहिती मिळावी व पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर आवास योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले. दरम्यान, पावसाळा तोंडावर असल्याने मान्सूनपूर्व कामे, आपत्कालीन उपाययोजना यासह गावातील अतिक्रमणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
 
 
अशी आहे ‘जन्म-मृत्यू सहाय्य योजना’
'Birth and Death Assistance Scheme'  ग्रामसभेत ग्रामनिधीतून ‘जन्म-मृत्यू सहाय्य योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून योजनेनुसार गावातील कोणत्याही कुटुंबात जन्म किंवा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला अर्ज केल्यानंतर चार दिवसांच्या आत धनादेशाद्वारे 4 हजार 900 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात कोणत्याही सरपंचाला ग्रामसभेच्या मंजूरी शिवाय एकतर्फी निर्णय घेऊन ही योजना बंद करता येणार नाही. असा महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आला.
 
 
ओबीसी स्वतंत्र कॉलमसाठी ठराव
जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा ग्रामसभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. यावेळी स्वतंत्र ओबीसी कॉलम उपलब्ध होईपर्यंत जनगणनेत सहभागी न होण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.