- डाॅक्टर पत्नीसाेबत संसार करण्याचे न्यायालयाचे आदेश
अनिल कांबळे
नागपूर,
Divorce Petition Dismissed पती आयपीएस अधिकारी आणि पत्नी डाॅक्टर असलेल्या एका उच्चशिक्षित जाेडप्याच्या वैवाहिक वादामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पत्नीने वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, याचाच अर्थ ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निराेगी आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका नाकारली आणि संसार पुनर्स्थापित करण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
चंद्रपूर येथील 49 वर्षीय आयपीएस अधिकारी यांचा विवाह 21 मे 2007 राेजी अमरावती येथील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत 40 वर्षीय असिस्टंट प्राेेसर महिलेसाेबत झाला हाेता. लग्नानंतर पतीने असा आराेप केला की, पत्नी अत्यंत छाेट्या गाेष्टींवरून रागावते, भांडी व महागड्या वस्तूंची ताेडाेड करते. तिने दाेनदा त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच तिने मिझाेरममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा आराेप करत पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली हाेती. तर दुसरीकडे, पत्नीने हे सर्व आराेप नाकारले. पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी 50 हजार रुपये मानसिक व शारीरिक छळ केल्याचा प्रतिआराेप तिने केला. ती गराेदर असताना पतीने तिच्या पाेटावर लाथ मारल्याचा आणि जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आराेपही तिने केला.
न्यायालयाचे निरीक्षण
Divorce Petition Dismissed कुटुंब न्यायालयाने आधीच पतीची घटस्फोटाची याचिका नाकारून पत्नीच्या बाजूने निकाल दिला हाेता. त्याला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. न्यायालयाने दाेन्ही बाजू तपासल्यानंतर मानसिक आजाराचा काेणताही पुरावा नाही, पत्नी मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सिद्ध करण्यासाठी पतीने काेणत्याही स्वतंत्र मानसाेपचार तज्ज्ञाची साक्ष किंवा अधिकृत वैद्यकीय दस्तऐवज सादर केले नाही. उच्च शिक्षण हे निराेगी मनाचे लक्षण असून दाेघे वेगळे झाल्यानंतरही पत्नीने वैद्यकीय क्षेत्रातील तिचे पदव्युत्तर उच्च शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती असे करू शकत नाही, त्यामुळे तिच्यावर क्रूरतेचा किंवा मानसिक आजाराचा लावलेला आराेप खाेटा ठरताे. या कारणास्तव न्यायालयाने पतीचे सर्व आराेप नाकारून लावत त्यांची अपील याचिका फेटाळली आणि पती-पत्नीला साेबत राहण्याचे आदेश कायम ठेवले.