गडचिरोली,
Educational Trip सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसह त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने 120 विद्यार्थ्यांची दिल्ली येथे विमानाद्वारे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. 29 मे ते 1 जून 2026 या कालावधीत आयोजित या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी आज नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रस्थान केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांना विमानतळावरून रवाना केले.
या उपक्रमांतर्गत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दौर्यात सिरोंचा येथील निवासी शाळेतील 40 विद्यार्थिनी, तर वांगेपल्ली आणि नवेगाव येथील निवासी शाळांमधील प्रत्येकी 40 विद्यार्थी अशा एकूण 120 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक दौर्याची संधी मिळाली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमानप्रवास असल्याने त्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. दिल्ली दौर्यादरम्यान विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनाला भेट देण्याची तसेच देशाच्या संसदीय लोकशाहीचे केंद्र असलेल्या संसद भवनाच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय दिल्लीतील विविध ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन देशाचा इतिहास, संस्कृती आणि वारसा यांविषयी प्रत्यक्ष माहिती घेता येणार आहे.
Educational Trip विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यामध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यास मदत होणार असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मौल्यवान संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी सांगितले.