‘हे मृत्यू नाही तर हत्या’

विषारी दारू प्रकरणात फडणवीसांचे कठोर आदेश

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पुणे,
Fadnavis's Orders in Toxic Liquor Case पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे घडलेल्या भीषण घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ७ आणि पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी हे मृत्यू नसून हत्या असल्याचे सांगत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही आणि या रॅकेटचा संपूर्ण नाश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
6787
फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपींसह एकूण ८ जणांना अटक केली आहे. विषारी दारू कुठे आणि कशी तयार झाली याचा शोध पोलिसांनी लावला असून संपूर्ण साखळी उघड करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्राथमिक तपासात ही दारू बनवण्यासाठी मिथेनॉलसारख्या घातक रसायनांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिकृत आणि सविस्तर तपास अहवाल फॉरेन्सिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. गंभीर रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी तपास करत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.