दिग्रसला मान्सूनपूर्व कामे प्रलंबित

    दिनांक :29-May-2026
Total Views |
नगर परिषदेचे दुर्लक्ष

दिग्रस, 
Digras Municipal Council पुढच्याच महिन्यात पावसाळ्याची सुरवात होणार आहे. शहरात मान्सूनपूर्व अनेक कामे प्रलंबित दिसत असताना याकडे दिग्रस नगर परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून याचा चांगलाच फटका नागरिकांना बसणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे. हवामान अंदाजानुसार, विदर्भात पूर्वमान्सून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने नगर परिषदेने गटारे आणि नाल्या वेळेत न साफ केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर व घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
 
digras
 
अपूर्ण राहिलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे खड्डे पडणे, रस्ते खचणे आणि वाहतूक कोंडी होणे हे स्पष्ट आहे. या कामांसाठी पुरेसा वेळ न काढल्यास ही मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यास मान्सूनमध्ये पूरस्थिती, वीज खंडित होणे व वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्यांशी दिग्रसकरांना सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाèया धावंडा नदीकाठच्या रहिवाशांंच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना, नदीपात्रांची स्वच्छता, पर्णवेलीचे उच्चाटन, पावसाळ्यात धावंडा व मोरणा नद्यांच्या नैसर्गिक पानी प्रवाहातील संभाव्य अडथळे दूर करणे, नाल्यासफाई, मान्सूनपूर्व उपाययोजनांना नगर परिषदेने आता युद्धपातळीवर गती देवून ही कामे पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे.
मुख्याधिकारी नसल्याने कामे प्रलंबित
igras Municipal Council  मान्सूनपूर्व कामांचे काय, या संदर्भात समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली. याबाबत दिग्रस नगर परिषद अध्यक्ष पंचशीला इंगोले यांच्या वतीने वाल्मिक इंगोले यांनी खुलासा करत, 26 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत सर्व वार्षिक निविदांसह इतरही सर्व निविदा बोलावण्याबाबत मंजुरी दिली होती. त्यानंतर अध्यक्षांनी विभागप्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. 4 मे रोजी यासंबंधी स्वतंत्र बैठक घेऊन 15 मे पर्यंत निविदांची कार्यवाही पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली. परंतु त्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यातच 16 मे पासून विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू झाली असून नियमित मुख्याधिकारी असते तर असा विलंब झाला नसता असे सांगितल्या जात आहे.