मुंबई,
IMD's Shocking Forecast भारत हवामान विभागाने मान्सून 2026 संदर्भात जाहीर केलेल्या दुसऱ्या दीर्घकालीन अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या अंदाजानुसार यंदाच्या पावसाळ्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्रातही पावसाची तूट जाणवण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर 2026 या मान्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा आकडा सामान्यपेक्षा कमी मानला जातो. महाराष्ट्र हा मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही हवामान विभागांत येत असल्याने येथेही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. विशेषतः मध्य भारतात आणि दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते.
विदर्भ मराठवाड्यावर परिणाम होणार
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे मान्सून कोअर झोनमध्ये येतात. या भागांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने पावसाची कमतरता थेट खरीप हंगामावर परिणाम करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जून महिन्यातच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने सुरुवातीपासूनच पावसाची ओढ कायम राहू शकते.यंदा केवळ पावसाची कमतरता नाही तर उष्णतेच्या लाटाही अधिक तीव्र राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानासोबत किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसासोबतच रात्रीही उकाड्याचा त्रास वाढू शकतो.
महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक
हवामान विभागाने प्रशांत महासागरातील परिस्थिती ‘न्यूट्रल’ असली तरी पुढील काळात ‘एल निनो’ परिस्थिती तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या एल निनो वर्षांमध्ये भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक जाणवते, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवले आहे.कमी पावसाचा परिणाम शेती, पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि पर्यावरणावर होऊ शकतो, असेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भासाठी हा अंदाज अधिक चिंताजनक मानला जात आहे. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला पाणी साठवणूक, शेती नियोजन, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे आणि उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुलै महिन्याचा सविस्तर पावसाचा अंदाज जूनच्या अखेरीस जाहीर केला जाणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.