शेडगाव येथे नदीत बुडून तिघांचा मृत्यू

    दिनांक :29-May-2026
Total Views |
* बापलेक अन् लेकीच्या मैत्रीणीचा समावेश
 
समुद्रपूर, 
Incident in Vana River तालुयातील शेडगाव येथील वणा नदीत अधिक मासानिमित्त स्नान करण्यासाठी गेलेल्या बापलेक आणि लेकीच्या मैत्रीणीचा मृत्यू झाला. ही घटना आज २९ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल किनकर (४०) त्यांची मुलगी रिद्धिमा तसेच मुलीची मैत्रीण श्रावणी उर्फ गुंजन मेश्राम हे तिघे अधिक मासानिमित्त शेडगाव येथील वणा नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. स्नान करत असताना अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर पोलिस प्रशासन व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवून रिद्धिमा व गुंजन या दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
 
 
ded
 
Incident in Vana River  काही वेळानंतर अतुल किनकर यांचा यांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह मिळाल्यानंतर गावकरी व प्रशासन यांच्यामध्ये काहीकाळ नुकसान भरपाईसाठी तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे, तहसिलदार कपिल हाटकर, उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायर, पोलिस निरिक्षक अनिल ठाकूर, समुद्रपूरचे ठाणेदार रविंद्र रेवतकर, गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड, शेडगावचे माजी सरपंच मुरलीधर चौधरी यांनी गावकर्‍यांची समजुत काढून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अतुल किनकर हा पेंटिंगचे काम करीत होता. मुलगी रिद्धिमा दहावीत गेली. गुंजन उर्फ श्रावणी शेडगाव येथे आजोबा लक्ष्मण गेडाम यांच्या घरी राहुन समुद्रपूर येथील विकास विद्यालय येथे दहाव्या वर्गात शिकत आहे. अधिक मासानिमित्त नदीकाठी मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना पाण्यात उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
 
वणा नदीत रेतीचे अवैध उत्खनन होत आहे. त्यासाठी नदीच्या रेतीच्या उपस्यासाठी डोंग्यांनी मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.