नवी दिल्ली
India's Major Abhilasha Barak Award संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिक दिनानिमित्त भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांकडून भारतीय लष्करातील दोन शूर जवानांना मरणोत्तर सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात येणार असून, भारतीय महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनाही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जागतिक शांतता मोहिमांमध्ये भारतीय सैनिकांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची ही मोठी दखल मानली जात आहे.संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विशेष समारंभात भारतीय लष्करातील लान्स हवालदार हरभजन सिंग आणि नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान यांना मरणोत्तर डॅग हॅमरस्कजोल्ड पदक प्रदान केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान कर्तव्य बजावताना या दोन्ही जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले होते.

लान्स हवालदार हरभजन सिंग हे काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत होते. तर नायब सुभेदार सुजित कुमार प्रधान यांनी दक्षिण सुदानमध्ये सेवा बजावताना देशाचा मान उंचावला होता. दोन्ही जवानांच्या शौर्याची आणि सेवाभावाची जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे.याच कार्यक्रमात भारतीय लष्करातील मेजर अभिलाषा बराक यांना २०२५ सालासाठी ‘मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान महिला सक्षमीकरण, स्थानिक महिलांशी संवाद आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. त्या सध्या संयुक्त राष्ट्रांच्या महिला सहभाग पथकाच्या कमांडर म्हणून काम पाहत आहेत.
विशेष म्हणजे, मेजर अभिलाषा बराक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर पायलट आहेत. आपल्या धाडसी आणि प्रेरणादायी कार्यामुळे त्या भारतीय महिला अधिकाऱ्यांसाठी नवा आदर्श ठरल्या आहेत. याआधी मेजर सुमन गवानी आणि मेजर राधिका सेन यांनाही हा सन्मान मिळाला होता. आता मेजर अभिलाषा या हा गौरव मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजपर्यंत सुमारे १८० भारतीय शांतता सैनिकांनी जगभरात शांतता प्रस्थापित करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. सध्या ४,२०० हून अधिक भारतीय सैनिक आणि पोलीस कर्मचारी विविध देशांतील संवेदनशील भागांत सेवा बजावत आहेत. भारतीय सैनिक त्यांच्या शिस्त, धैर्य आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे जगभरात विशेष ओळख निर्माण करत आहेत.