नवी दिल्ली,
India's Support in Nepal's २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी भारत पुन्हा एकदा मोठ्या मदतीसह पुढे आला आहे. नेपाळमधील भूकंपग्रस्त भागांमध्ये १४ नवीन शाळा उभारण्याचा निर्णय भारताने घेतला असून यासाठी तब्बल ५६०.२ दशलक्ष रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावास आणि नेपाळच्या शिक्षण मंत्रालयामध्ये यासंदर्भात महत्त्वाचा करार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गोरखा, नुवाकोट, धादिंग, दोलखा, काठमांडू, कावरेपालंचोक, रामेछाप आणि सिंधुपालचोक या भूकंपाने प्रभावित जिल्ह्यांमध्ये आधुनिक आणि भूकंपरोधक शाळा उभारल्या जाणार आहेत.
नवीन शाळा अत्याधुनिक असणार
२०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपात सुमारे ९ हजार लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारो इमारती आणि शाळा जमीनदोस्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळच्या पुनर्रचना मोहिमेत सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवीन शाळा अत्याधुनिक आणि भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधल्या जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये सुसज्ज वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी फर्निचर तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा प्रकल्प भारताच्या ‘भूकंपोत्तर पुनर्रचना अभियानाचा’ भाग असून यापूर्वीही भारताने नेपाळमध्ये ७० शाळा आणि त्रिभुवन विद्यापीठाचे ग्रंथालय उभारण्यात मदत केली आहे. शेजारी राष्ट्र म्हणून नेपाळच्या विकासात आणि आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य वाढवणे, हा भारताचा प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.