शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ₹५ लाख कोटी बुडाले

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई,
Investors in the Stock Market देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर अचानक वाढलेल्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आणि सेन्सेक्स तब्बल १,०९२ अंकांनी कोसळला. बीएसईचा सेन्सेक्स १.४४ टक्क्यांच्या घसरणीसह ७४,७७५.७४ अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांक ३५९ अंकांनी घसरून २३,५४७.७५ वर स्थिरावला.या मोठ्या पडझडीमुळे बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सुमारे ₹५ लाख कोटींनी कमी झाले. बाजारमूल्य घसरून ₹४६६ लाख कोटींवर आले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचाच परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला.
 
 

stock market loss 
 
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असली तरी त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराला मंजुरी दिलेली नसल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे जागतिक तणाव अधिक वाढला आहे.सेन्सेक्समधील ३० पैकी २६ शेअर्स घसरणीसह बंद झाले. पॉवरग्रिडच्या शेअरमध्ये सर्वाधिक ४ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय इंडिगो, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, रिलायन्स, सन फार्मा आणि एनटीपीसीसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. दुसरीकडे टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल अँड टी आणि एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात वाढ दिसून आली.
 
 
निफ्टीमध्ये आयशर मोटर्स, इंटरग्लोब एव्हिएशन आणि ओएनजीसी हे सर्वाधिक घसरलेले शेअर्स ठरले. व्यापक बाजारात निफ्टी मिडकॅप निर्देशांकात घसरण झाली, तर स्मॉलकॅपमध्ये किरकोळ वाढ दिसली. दरम्यान, जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही चर्चेत आहेत. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ९३.७९ डॉलरच्या आसपास स्थिर असून मध्यपूर्वेतील तणावामुळे पुढील काळात बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.