टाकळी(निधा)त ‘हर घर जल’ नव्हे ‘हर घर प्यासा’

    दिनांक :29-May-2026
Total Views |
*अनेक घरांचा पाणीपुरवठा ठप्प
*ग्रामसेवक ‘पाहुणे’ तर प्रशासक ‘कागदोपत्री’
 
आजनसरा, 
Jal Jeevan Mission केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करणार्‍या प्रशासनाचा दावा टाकळी (निधा) गावात सपशेल फोल ठरला आहे. नळजोडणीच्या बेजबाबदार आणि घाईघाईत केलेल्या सुमार कामामुळे गावातील अर्धा भाग १५ दिवसांपासून पाण्याविना तडफडत असून गावातील पाणी समस्येकडे लक्ष देण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासकांना वेळ नसल्याचा आरोप गावाकर्‍यांकडून करण्यात येत आहे. ‘हर घर जल’ कागदावर राहिला आणि प्रत्यक्षात ‘हर घर प्यासा’ अशी अवस्था झाली आहे.
 
 
Jal Jeevan Mission
 
गेल्या पंधरवाड्यात अकुशल कामगारांकडून करण्यात आलेली जलवाहिनी जोडणी पूर्णपणे फसली. चुकीच्या पद्धतीने जलवाहिणीची जोडणी करण्यात आल्यामुळे अर्ध्या गावातील नळातील पाण्याचा दाबच संपला असून शेकडो घरांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे, गावात नळयोजना आणि पाणीसाठा मुबलक असतानाही केवळ चुकीच्या जोडणीमुळे लोकांना थेंब-थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
 
 
 
Jal Jeevan Mission  मे महिन्याच्या ४५ अंशांवरील कडक उन्हात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. महिला डोयावर हंडे घेऊन २-३ किमी दूरच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी धडपडत आहेत. संतापाची बाब म्हणजे ग्रामसेवक महिन्यातून एकदाच ‘पाहुणे’ म्हणून गावात डोकावतात तर ग्रापं प्रशासक फत कागदोपत्री अस्तित्वात आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे. नळ योजना आहे, पाणी आहे. पण, आमच्या नळाला एक थेंबही येत नाही, हे थेट आमच्या जगण्याच्या हक्कावर घाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकरी देत आहेत, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन जवंजाळ यांनी प्रशासनाला तातडीने सुमार नळजोडणी दुरुस्त करून २४ तासांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा हंडे-कळशीसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोडणी करुन गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणार्‍या जबाबदार ठेकेदार आणि देखरेख करणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे.