नवी दिल्ली
Mangoes भारतीय आंब्यांच्या निर्यातीला मोठा धक्का देत जपान सरकारने चालू हंगामात भारतातून आयात होणाऱ्या ताज्या आंब्यांवर बंदी लागू केली आहे. भारतीय आंबा प्रक्रिया केंद्रांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास दोन दशकांनंतर जपानने भारतीय आंब्यांवर अशी कठोर कारवाई केली असून, यामुळे देशातील आंबा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये चिंता वाढली आहे.
एप्रिल ते जून हा भारतीय आंबा निर्यातीचा प्रमुख हंगाम मानला जातो. मात्र या काळातच जपानसारख्या उच्च दर्जाच्या बाजारपेठेने दरवाजे बंद केल्याने हापूस, केशर, लंगडा आणि बनगनपल्लीसारख्या प्रीमियम दर्जाच्या आंब्यांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे. विशेषतः कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जपान हा आपल्या देशातील शेती आणि फळबागांचे परदेशी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत कडक ‘झिरो-टोलरन्स’ धोरण राबवणारा देश मानला जातो. यापूर्वीही फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे जपानने भारतीय आंब्यांवर बंदी घातली होती. त्यानंतर भारताने प्रक्रिया आणि तपासणी यंत्रणा मजबूत केल्यानंतर 2006 मध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.जपानला निर्यात होणाऱ्या आंब्यांना ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ अर्थात ‘VHT’ प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेत नियंत्रित उष्ण आणि दमट हवेच्या साहाय्याने आंब्यामधील कीटक, अळ्या आणि फळमाशी नष्ट केली जाते. विशेष म्हणजे या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही. भारत आणि जपान यांच्यातील करारानुसार ही प्रक्रिया बंधनकारक आहे.
मार्च 2026 मध्ये जपानच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील रेहमानपूर येथील ‘VHT’ केंद्राची पाहणी केली होती. या तपासणीत कीड-नियंत्रण आणि धुरीकरण प्रक्रियेमध्ये गंभीर तांत्रिक आणि व्यवस्थापकीय त्रुटी आढळल्याचे समोर आले. यानंतर योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने 25 मार्च 2026 नंतर जारी करण्यात आलेली भारतीय तपासणी प्रमाणपत्रे स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.दोन्ही देशांनी अद्याप नेमक्या त्रुटी सार्वजनिक केलेल्या नसल्या तरी, या निर्णयामुळे भारतीय आंबा व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. भारत हा दरवर्षी जवळपास 28 मिलियन मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. यातील बहुतांश आंबा देशांतर्गत बाजारात विकला जातो, मात्र जपानसारख्या प्रीमियम बाजारपेठांमध्ये मिळणाऱ्या उच्च दरांमुळे निर्यातदार आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.जपान हा भारताचा सर्वात मोठा आंबा आयातदार नसला तरी तेथील बाजारपेठ प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे या बंदीमुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर भारतीय आंब्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि कृषी निर्यात यंत्रणा आता जपानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रक्रिया सुधारण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.