विंटरथूर,
Knife attack in Switzerland स्वित्झर्लंडमधील विंटरथूर शहरात गुरुवारी सकाळी घडलेल्या चाकू हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली. रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीने अचानक नागरिकांवर चाकूने हल्ला करत तिघांना जखमी केले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकाराला दहशतवादी स्वरूपाचे कृत्य मानले आहे. हल्ल्यानंतर काही मिनिटांतच संशयिताला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी तातडीने पोलीस आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या. पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत आरोपीला ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

तपासात आरोपीची ओळख ३१ वर्षीय स्विस-तुर्की दुहेरी नागरिक म्हणून पटली आहे. तो विंटरथूरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी इस्लामिक स्टेटशी संबंधित प्रचार साहित्य वाटप केल्यामुळे तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला होता. काही दिवसांपूर्वी त्याने आपत्कालीन क्रमांकावर संशयास्पद फोन कॉल केले होते. त्यानंतर त्याला मानसोपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो धोकादायक नसल्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. या हल्ल्यात २८, ४३ आणि ५२ वर्षांचे तीन नागरिक जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका जखमी व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासानुसार आरोपीने हा हल्ला एकट्याने केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. झुरिचमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत याला अत्यंत घृणास्पद दहशतवादी कृत्य म्हटले आहे. आरोपीचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झाला असून त्याने २००९ मध्ये स्विस नागरिकत्व मिळवले होते. गेल्या काही वर्षांत तो तुर्कीमध्येही राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.