मुंढेंचा ॲक्शन मोड; 3 दिवसांत 53 धाडी!

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई,
Mundhe in Action Mode अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात कठोर कारवाईची मोहीम सुरू करून प्रशासनात मोठी हालचाल निर्माण केली आहे. पदभार घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अन्न सुरक्षा आणि औषध नियंत्रण यंत्रणेला सक्रिय करत भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाईचे आदेश दिले.मुंढे यांनी 25 मे रोजी आयुक्तपद स्वीकारल्यानंतर लगेचच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना कठोर तपासणी आणि धाडी टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर छापे टाकून भेसळयुक्त आणि प्रतिबंधित पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली.
 
 

x45546 
 
या मोहिमेत एकूण 53 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 34 ठिकाणी प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची अवैध विक्री आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी 25 एफआयआर दाखल करत 33 जणांना अटक केली आहे. तसेच 5 वाहने जप्त करण्यात आली असून 27 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान सुमारे 20 लाख रुपयांपेक्षा अधिकचा अवैध साठा जप्त करण्यात आला.मुंबई विभागात सर्वात मोठी कारवाई झाली असून येथे 19 आस्थापनांवर थेट सील ठोकण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा बेकायदेशीर साठा आणि विक्री आढळून आली. संबंधित 19 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
गुटखा आणि पानमसाल्याव्यतिरिक्त अन्न व औषध प्रशासनाने इतर 23 आस्थापनांचीही तपासणी केली आहे. यामध्ये पॅकबंद पाणी, दूध, तेल, मसाले, फरसाण, आईसक्रीम, तूप, पनीर, खवा आणि बेकरी पदार्थ यांसारख्या दैनंदिन वापरातील अन्नपदार्थांचा समावेश होता. या तपासणीत सुमारे 28 लाखांहून अधिक किमतीचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नसाठा जप्त करण्यात आला असून सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली असून तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीए पुन्हा एकदा ‘ॲक्शन मोड’मध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.