नवी दिल्ली,
Officer Dies Due to AC Explosion दिल्लीतील हौझ खास परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घरातील एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटानंतर पसरलेल्या धुरामुळे एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. धनेंद्र कुमार असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, या दुर्घटनेत त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, रात्री उशिरा अचानक एसी यंत्रणेत बिघाड होऊन स्फोट झाला. त्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. धुरामुळे घरातील सदस्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी धनेंद्र कुमार आणि त्यांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळले. परिसरातील लोकांनी आणि बचाव पथकाने तातडीने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच धनेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने काही वेळातच आग नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात एसी युनिटच्या स्फोटामुळेच ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. त्या वेळी घरात कुटुंबातील सदस्यांसह घरगुती मदतनीस असे एकूण पाच जण उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून, सध्या कोणत्याही घातपाताचा संशय नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. जखमी मुलाची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.