शेती परवडेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या..

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पुणे
Onion Price राज्यात कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट गांजा लागवडीस परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे जाहीर पत्र तहसीलदारांना पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
 

Onion Price  
जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील कांदा उत्पादक शेतकरी सुनील उकिर्डे यांनी वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि अत्यल्प बाजारभावामुळे शेती करणे अवघड झाल्याचे नमूद करत प्रशासनाकडे हे निवेदन सादर केले आहे. नाफेडमार्फत कांद्याला जाहीर करण्यात आलेला १२ रुपये ३५ पैसे प्रति किलो दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उकिर्डे यांच्या म्हणण्यानुसार, २०२५-२६ हंगामात त्यांनी सुमारे दहा एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. बियाणे, खते, मजुरी आणि सिंचन यांचा वाढता खर्च पाहता एकरी सुमारे १ लाख २० हजार रुपये खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बाजारात मिळणाऱ्या Onion Price दरामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा सहन करावा लागत असून एकरी ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
या सततच्या नुकसानीमुळे शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याची भावना व्यक्त करत, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गांजा लागवडीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे शेतकरी वर्गातील असंतोष आणि आर्थिक अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
दरम्यान, कांद्याच्या दरातील घसरण आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत आले असून सरकारकडून ठोस आधारभूत किंमत आणि बाजार हस्तक्षेपाची मागणी सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना शेतकरी संकटाची गंभीर दखल घेण्याची गरज अधोरेखित करणारी ठरत आहे.