ओव्हरलोड रेती वाहतूक, रस्त्यावर साचलेली रेती
मोठ्या दुर्घटनेची शक्यता
पांढरकवडा,
Overloaded Sand Transport राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 व राज्य महामार्गाला जोडणारा उमरी ते कोंघारा हा महत्त्वाचा व वर्दळीचा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. अरुंद रस्ता, धोकादायक वळणे, तीव्र चढ-उतार आणि त्यातच नियमबाह्य सुरू असलेली ओव्हरलोड रेती वाहतूक यामुळे दररोज वाहन चालकांचा जीव धोक्यात येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडणाèया रेतीमुळे अनेक अपघात घडत असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो ट्रॅक्टर व ट्रक क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहतूक करत आहेत. अनेक वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक असलेली ताडपत्री लावली जात नाही. त्यामुळे ब्रेकर, वळण आणि चढ-उताराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती रस्त्यावर सांडत आहे. दुचाकी वाहनांची चाके रेतीवर घसरून अपघात घडत असून भरधाव वाहनांना अचानक ब्रेक लागत नसल्याने गंभीर दुर्घटनांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, तेलंगटाकळी परिसरातील धोकादायक वळणावर चक्क गाडीभर रेतीचा ढिगारा पडून असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन व पोलिस विभाग कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
ओव्हरलोड वाहतुकीवर काय सांगतो कायदा ?
Overloaded Sand Transport मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 113 व 114 नुसार वाहनाने निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच कलम 194 अंतर्गत ओव्हरलोड वाहनांवर मोठा दंड आकारण्याची तरतूद आहे. नियमांचे उल्लंघन करणाèया वाहनांवर दंड, वाहन जप्ती तसेच परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते. याशिवाय वाहनातून माल रस्त्यावर पडून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास भारतीय न्याय संहिनेनुसार निष्काळजीपणामुळे जीवितास धोका निर्माण करणे, सार्वजनिक मार्ग धोकादायक बनविणे या संदर्भातील गुन्हे दाखल होऊ शकतात. अपघातात गंभीर दुखापत किंवा मृत्यू झाल्यास संबंधित वाहन चालक, मालक आणि जबाबदार अधिकाèयांवर फौजदारी कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रशासनाला नागरिकांचे प्रश्न
ओव्हरलोड रेती वाहतूक थांबविण्यासाठी तपासणी मोहीम का नाही, ताडपत्रीविना धावणाèया वाहनांवर कारवाई का होत नाही, रस्त्यावर पडलेली रेती तत्काळ साफ करण्याची जबाबदारी कोणाची, मोठी जीवहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असे प्रश्न विचारले असून तातडीने कारवाई करून ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, धोकादायक ठिकाणांवरील रेती हटवावी, तसेच नियमभंग करणाèया वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.