प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या कामांना गती द्या : जिल्हाधिकारी कुंभेजकर

    दिनांक :29-May-2026
Total Views |
वाशीम, 
PM Agricultural Irrigation Scheme प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून, जलसंधारण व सिंचन व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शेती उत्पादनवाढीस मोठी चालना मिळणार आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर, भूजल पुनर्भरण आणि सिंचन सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.
 
 
Irrigation Scheme
 
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी, वरिष्ठ भूवैज्ञानिक वैभव श्रीरामे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
जिल्ह्यातील जलसंधारण कामे, पाणलोट विकास, सूक्ष्म सिंचन प्रकल्प, शेततळे, नाला खोलीकरण, डाळींचे बांध, गॅबीयन बंधारे, साठवण तलाव तसेच भूजल पातळी वाढविण्याच्या उपाययोजनांच्या प्रगतीची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी सादर केली. पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅग छायाचित्र ३१ मेपर्यंत अपलोड करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच ‘कॅच दि रेन’ अभियानांतर्गत रिपोर्टिंग योग्य प्रकारे झाले आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
 
PM Agricultural Irrigation Scheme  जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत आतापर्यंत ६९.९२ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामे गतीने पूर्ण करून त्यामध्ये गुणवत्ता राखण्यावर भर द्यावा, ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीसाठी उपयुक्त ठरेल, यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागांमध्ये समन्वय राखून उर्वरित कामे गतीमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी कृषी आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.