भाविक व प्रवाशांची मोठी गैरसोय
मानोरा,
Pohradevi Bus Stand देश पातळीवर बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे दररोज राज्यभरातून शेकडो भाविक व प्रवासी येत असतात. मात्र, येथील बसस्थानकावरील स्वच्छतागृहाला कायम कुलूप असल्याने महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
Pohradevi Bus Stand बसस्थानक परिसरात स्वच्छतागृह असूनही ते बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृह परिसरात पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोहरादेवी येथे धार्मिक महत्त्व असल्याने दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. महिलांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन स्वच्छतागृह नियमित सुरू करावे, स्वच्छता राखावी तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवासी व भाविकांकडून होत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बसस्थानक परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पोहरादेवीच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.