सिद्धरामय्या यांनी सोडली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

कर्नाटकात सत्ता बदल निश्चित

    दिनांक :29-May-2026
Total Views |
बंगळूर,
Siddaramaiah's Resignation कर्नाटकातील राजकीय घडामोडींना अखेर निर्णायक वळण मिळाले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या संघर्षानंतर आता डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. राज्यपाल बंगळुरूत परतल्यानंतर त्यांनी सिद्धरामय्या यांचा राजीनामा अधिकृतरीत्या मंजूर केला. त्यामुळे आता राज्यात नवीन नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार यांचा शपथविधी १ किंवा ३ जून रोजी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस हायकमांडने या सत्तांतराची संपूर्ण रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदल, राज्यसभा उमेदवार आणि विधान परिषद निवडीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
 

Siddaramaiah 
 
 
नव्या सरकारमध्ये सामाजिक तसेच प्रादेशिक समतोल साधण्यासाठी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, तर चार उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचाही विचार सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये मोठा राजकीय बदल पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
 
 
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत भावना व्यक्त केल्या. पक्षाच्या हायकमांडच्या निर्देशानुसार आपण पदाचा राजीनामा दिला असून राज्यहिताला नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेसाठी किंवा संपत्तीसाठी आपण कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या पाच दशकांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. “माझे राजकीय आयुष्य खुले पुस्तक आहे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाबाबत दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतरच हा निर्णय अंतिम झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर पक्षातील मतभेद कमी झाले आणि अखेरीस सिद्धरामय्या यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कर्नाटकात नव्या राजकीय समीकरणांसह पुढे जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.