एसटीचा प्रवास महागणार

    दिनांक :29-May-2026
Total Views |
इंधन दरवाढीचा फटका
प्रवास भाड्यात ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
दररोज १ लाख ४० हजाराचा अतिरिक्त आर्थिक भार

नागपूर,
ST Bus Travel पेट्रोल-डिझेलच्या दरात महिन्याभरात तीनवेळा दरवाढ झाल्यामुळे नागपूर विभागातील एसटीवर दररोज सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. महामंडळाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी प्रवासी भाडेवाढ करण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने येत्या काही दिवसात एसटी बसच्या प्रवास भाड्यात ४ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
 

MSRTC-Bus 
एसटी प्रवास महागण्याचे संकेत
मुख्यत: आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा एसटी महामंडळाला बसण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या एसटी बसमधून प्रवास करणे आता महाग होणार आहे. आता वर होत असून, आता महाराष्ट्रातील ’सामान्यांची लोकवाहिनी’ मानल्या जाणार्‍या एसटी बसचा प्रवासही महागण्याची संकेत आहेत. दररोजच्या वाढत्या खर्चामुळे राज्यातील सर्व एसटी विभागांनी आपल्या केंद्रीय कार्यालयाला वाढत्या आर्थिक अडचणीची माहिती पाठविली आहे. त्यामुळे महामंडळाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी प्रवासी भाडेवाढ केली जाणार आहे. दरवाढ टाळून प्रवाशांना दिलासा द्यायचा असल्यास सरकारला महामंडळाला अनुदान द्यावे लागेल. डिझेल खर्चासोबतच बसच्या देखभाल-दुरुस्तीवरही खर्च वाढल्याने एसटी चालविणे कठीण झाले आहे. यासंदर्भात दरवाढीचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे.
दररोज ३७ हजार लिटर डिझेलची गरज
ST Bus Travel  एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातून सुमारे ४२५ एसटी बसेस धावतात. या सर्व बससाठी दररोज जवळपास ३७ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. यासाठी एसटी महामंडळाला दररोज सुमारे ३३.५ लाख रुपयांचा खर्च लागतो. डिझेल दरवाढीनंतर एसटीवर अतिरिक्त आर्थिक भार वाढला आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत प्रवासी भाडेच असल्याने डिझेल दरवाढीमुळे दररोज होणारा तोटा भरून काढण्यासाठी ४ टक्के भाडेवाढ आवश्यक असल्याचे मत एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
ट्रॅव्हल्सचे भाडे वाढणार
गणेशपेठ येथील मुख्य बसस्थानकालगतच्या बैद्यनाथ चौकात ट्रॅव्हल्स बसगाडयांचे हब तयार झाले आहे. सर्वाधिक ट्रॅव्हल्स बसेस येथूनच धावत असल्याने मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एसटीच्या इंधन दरवाढीनंतर लांब पल्ल्याच्या वातानुकूलित बसच्या प्रवास भाड्यात सुध्दा वाढ शक्यता आहे.