पोलिसांच्या निवासाला ताडपत्रीचा ‘आधार’

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मान्सूनपूर्व ताडपत्री टाकण्याची नामुष्की

राळेगाव, 
Tarpaulins over Police Residences नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांच्या घरांची दुर्व्यवस्था झाल्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानांवर ताडपत्री टाकण्याची नामुष्की पोलिस प्रशासनावर आली आहे. विशेष म्हणजे राळेगावच्या ठाणेदार निवासासह इतरही निवासांची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात या निवासांना गळती लागत असून येथील महिला ठाणेदारांनी मान्सूनपूर्व तयारी केली असून या घरांच्या छतांवर ताडपत्री टाकून पावसाच्या गळतीपासून बचावाची व्यवस्था केली आहे.
 
 
tadpatri
 
Tarpaulins over Police Residences  राळेगाव परिसरातील 32 गावांची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीची दयनीय अवस्था पाहता त्यांच्या कुटुंबियांवर टांगती तलवार आहे. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, दारे-खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. अनेक घरांचे प्लॅस्टर निखळले आहे, तर टिनपत्र्यांना भोके पडली आहेत. त्यामुळे निवासाला पावसाळ्यात गळती लागत आहे. त्यामुळे पोलिस वसाहतीतील अनेक निवासांना ताडपत्रीचा आधार दिला जात आहे. येथील पोलिस निवास हे बऱ्याच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या घरांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. दिवस-रात्र डोळ्यांत तेल घालून नागरी सुरक्षेसाठी लढणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र सुटता सुटत नसल्याने मोडकळीस आलेल्या घरांत पोलिसदादा व त्यांच्या कुटुंबियांना नाईलाजास्तव वास्तव्य करावे लागत असल्याची त्यांना खंत आहे.

अपुरी निवासस्थाने व जीर्ण
सध्या उपलब्ध असलेली पोलिस निवासस्थाने कर्मचारी संख्येच्या तुलनेत अपुरी आहेत. परिणामी अनेक पोलिस कर्मचारी शहरातील विविध भागांत भाड्याचे घर घेऊन राहतात.