नवी दिल्ली,
fifa world cup फुटबॉलच्या जगातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा मानला जाणारा फिफा विश्वचषक २०२६ मध्ये एका नव्या पर्वात प्रवेश करणार आहे. जवळपास शतकभरापूर्वी अवघ्या १३ संघांसह सुरू झालेली ही स्पर्धा आता ४८ संघांपर्यंत विस्तारली असून, आगामी विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा आणि भव्य फुटबॉल महोत्सव ठरणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेमुळे फुटबॉलचा जागतिक विस्तार आणखी स्पष्टपणे दिसून येणार आहे.
१९३० मध्ये उरुग्वेमध्ये पहिला फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्या काळात फिफाचे केवळ १६ सदस्य देश होते आणि सर्वांना थेट निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दीर्घ समुद्री प्रवास आणि इतर अडचणींमुळे काही देश सहभागी होऊ शकले नाहीत. जपान आणि सियाम (सध्याचे थायलंड) यांनी माघार घेतली, तर इजिप्तचे जहाज चुकल्याने त्यांचा संघ वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे पहिल्या विश्वचषकात फक्त १३ संघांनी भाग घेतला आणि तिथून फुटबॉलच्या जागतिक प्रवासाला सुरुवात झाली.
यानंतर १९३४ पासून १९७८ पर्यंत विश्वचषकाचे स्वरूप १६ संघांपुरते मर्यादित राहिले. त्या काळात चार गट तयार केले जात आणि प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचत असे. या कालखंडात वापरण्यात आलेली विश्वचषक ट्रॉफी विजयाची ग्रीक देवी ‘नाइकी’च्या संकल्पनेवर आधारित होती. ही ट्रॉफी १९७४ पर्यंत वापरली गेली आणि नंतर सध्याची प्रसिद्ध सुवर्ण ट्रॉफी अस्तित्वात आली.
फुटबॉलचा वाढता जागतिक प्रभाव लक्षात घेऊन फिफाने १९८२ मध्ये मोठा निर्णय घेत स्पर्धेत आठ नवीन संघांचा समावेश केला. स्पेनमध्ये झालेल्या त्या विश्वचषकात प्रथमच २४ संघ मैदानात उतरले. या बदलामुळे आफ्रिका आणि आशियातील देशांना अधिक संधी मिळाली. त्या वेळी दोन गट टप्प्यांचे स्वरूप ठेवण्यात आले होते, मात्र पुढील स्पर्धांमध्ये ते रद्द करून अधिक थेट आणि रोमांचक बाद फेरीची पद्धत स्वीकारण्यात आली.
यानंतर १९९८ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकापासून संघांची संख्या ३२ करण्यात आली. हे स्वरूप जवळपास तीन दशक टिकले आणि कतारमध्ये २०२२ मध्ये झालेल्या विश्वचषकापर्यंत कायम राहिले. या पद्धतीत आठ गटांमध्ये प्रत्येकी चार संघांचा समावेश करण्यात येत असे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरत असत. ‘राऊंड ऑफ १६’ पासून सुरू होणाऱ्या थरारक लढतींमुळे विश्वचषकाची लोकप्रियता आणखी वाढली.
आता २०२६ मध्ये फिफा विश्वचषक एका नव्या आणि अधिक व्यापक स्वरूपात साकारला जाणार आहे. प्रथमच ४८ संघ सहभागी होणार असून, १२ गट तयार केले जातील. तसेच पहिल्यांदाच ३२ संघांची बाद फेरी खेळवली जाणार आहे. एकूण १०४ सामने होणार असल्याने हा विश्वचषक कालावधी, सहभाग आणि उत्साह या तिन्ही बाबतीत विक्रमी ठरणार आहे.
या विस्तारामुळे अनेक नवोदित देशांना विश्वचषकात स्थान मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.fifa world cup युरोपला सर्वाधिक १६ जागा देण्यात आल्या आहेत, तर आफ्रिकेला नऊ आणि आशियाला आठ जागा मिळाल्या आहेत. दक्षिण अमेरिका आणि कॉनकाकॅफ क्षेत्राला प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या असून, ओशनिया विभागालाही प्रथमच थेट प्रवेशाची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडने या विभागासाठी थेट पात्रतेचा मान मिळवला आहे.
फिफा विश्वचषकाचा हा प्रवास केवळ संघसंख्येतील वाढ दर्शवत नाही, तर फुटबॉलने जगभरात निर्माण केलेले आकर्षण, विस्तार आणि एकात्मतेचे प्रतीकही ठरत आहे. २०२६ ची स्पर्धा ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून जागतिक फुटबॉल संस्कृतीचा भव्य उत्सव ठरणार आहे.