मुंबई इंडियन्समध्ये ‘कॅप्टन्सी ट्विस्ट'

हार्दिककडून नेतृत्व काढून घेणार

    दिनांक :29-May-2026
Total Views |
मुंबई,
They will strip Hardik of the captaincy आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्याबाबत व्यवस्थापन गंभीर विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे. सलग अपयशी हंगामांमुळे आता त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरला. संघाला १४ लीग सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकता आले, तर दहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. गुणतालिकेत संघ तळाच्या क्रमांकावर घसरला. २०२० मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने शेवटचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर संघाला ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले असून, चाहत्यांमध्येही नाराजी वाढत आहे.
 
 

Hardik 
हार्दिक पांड्या २०२४ मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यावेळी रोहित शर्माला नेतृत्वातून दूर करण्यात आले होते. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक सामन्यांमध्ये संघाची रणनीती अपयशी ठरली, तर पॉवरप्लेमधील खराब कामगिरीही संघासाठी मोठा अडथळा ठरली. टी-२० क्रिकेटच्या बदलत्या शैलीशी जुळवून घेण्यात संघ अपयशी ठरल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान, संघ व्यवस्थापन आगामी हंगामासाठी मोठा आढावा घेण्याच्या तयारीत आहे. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफकडून काही निर्णय सुचवले गेले होते, मात्र मैदानावर त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता संघातील काही मोठ्या खेळाडूंच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
विशेष म्हणजे, हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. पुढील हंगामातही गुजरात अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर त्याला चाहत्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले. आता मुंबई इंडियन्सच्या बैठकीत हार्दिकच्या भवितव्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तो फक्त कर्णधारपद गमावेल की संघातूनही बाहेर पडेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, आगामी काही दिवसांत मुंबई इंडियन्सकडून मोठ्या घोषणांची शक्यता वर्तवली जात आहे.