तोंडातून फेस, चक्कर अन् १३ मृत्यू!

पुणे-पिंपरीत विषारी दारूचा कहर

    दिनांक :29-May-2026
Total Views |
पुणे,
Toxic Liquor Havoc in Pune-Pimpri पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनी मोठी खळबळ उडाली आहे. हातभट्टीच्या विषारी दारूचे सेवन केल्यानंतर अनेकांना अचानक चक्कर येणे, तोंडातून फेस येणे आणि प्रकृती गंभीर होण्याचे प्रकार घडले. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, काही जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात आठ जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील काळेपडळ आणि हडपसर परिसरात आणखी पाच जणांचा बळी गेला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींनी विषारी स्पिरिट मिसळलेली गावठी दारू प्यायल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी योगेश वानखेडे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, तो सराईत दारू विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
Toxic Liquor Havoc in Pune-Pimpri
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टीची दारू खुलेआम विकली जात असल्याचा आरोप केला आहे. अनेकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच निरपराध नागरिकांचा जीव गेला, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम राबवावी, अशी मागणीही होत आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणात वेगळी भूमिका घेतली आहे. मृत झालेल्या काही व्यक्तींचा मृत्यू इतर कारणांनी झाला असू शकतो, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूपूर्वी अनेकांना चक्कर आणि इतर गंभीर लक्षणे दिसल्यामुळे नागरिकांमध्ये संशय वाढला आहे. सर्व मृत्यूंचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या घटनेनंतर फुगेवाडी, दापोडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.