बंकरमध्ये लपलेल्या झरदारींच्या आता शौर्याच्या गप्पा!

    दिनांक :29-May-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Zardari Now Boasts of Valor पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भारताविरोधात मोठे दावे करत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची आठ विमाने पाडली तसेच भारतीय पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ ड्रोन पोहोचवले, असा दावा झरदारी यांनी केला. मात्र त्यांच्या या वक्तव्यांवर भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, झरदारी यांनी स्वतःच भारतीय कारवाईदरम्यान पाकिस्तानी सैन्याने त्यांना सुरक्षिततेसाठी बंकरमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात टीका आणि खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी या वक्तव्याची तुलना चित्रपटातील बढाईखोर संवादांशी केली आहे.
 
 
 
Zardari
दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केल्याचे वृत्त समोर आले होते. भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तरात्मक मोहिमेमुळे पाकिस्तानमधील काही हवाई तळ आणि लष्करी सुविधांचे नुकसान झाल्याचाही दावा करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून विविध प्रकारचे प्रतिदावे करण्यात येत आहेत.झरदारी यांनी केलेल्या “आठ भारतीय विमाने पाडली” या दाव्याबाबत कोणताही ठोस पुरावा अद्याप पाकिस्तानकडून सादर करण्यात आलेला नाही. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, आधुनिक युद्धामध्ये विमान पाडल्यास त्याचे अवशेष, ब्लॅक बॉक्स किंवा वैमानिकांबाबतची माहिती लगेच समोर येते. मात्र पाकिस्तानकडे अशा कोणत्याही पुराव्याचा अभाव असल्याने या दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
 
भारतीय संरक्षण यंत्रणांनी मात्र पाकिस्तानकडून करण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न वेळेत हाणून पाडल्याचे सांगितले जाते. हरियाणातील सिरसा परिसरात भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी क्षेपणास्त्र निष्प्रभ केल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार करण्यात येणाऱ्या दाव्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा चर्चेत आला असून, या वक्तव्यांमुळे राजकीय आणि सामरिक वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.