ग्लॅमर सोडून अध्यात्माचा स्वीकार

अभिनेत्री अन्ना जयसिंघानीचा वृंदावनकडे प्रवास

    दिनांक :03-May-2026
Total Views |
मुंबई
Anna Jaisinghani टीव्ही आणि मनोरंजन क्षेत्रात काम करून ओळख निर्माण केलेली अन्ना जयसिंघानी हिने अभिनय क्षेत्राला अलविदा करत पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. आता ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन असून वृंदावन येथे वास्तव्यास आहे. या निर्णयानंतर तिने आपले नाव बदलून अन्ना परी हरिवंशी असे ठेवले आहे.अन्नाने आपल्या आध्यात्मिक प्रवासाची माहिती स्वतःच्या ‘मेरो वृंदावन’ या यूट्यूब चॅनलवर शेअर केली आहे. ग्लॅमरच्या जगातून बाहेर पडत तिने भक्तिमार्ग स्वीकारल्याने तिचा हा बदल चर्चेचा विषय ठरत आहे.
 

Anna Jaisinghani  
ग्वाल्हेर येथील अन्नाला लहानपणापासून नृत्य आणि अभिनयाची प्रचंड आवड होती. याच स्वप्नांच्या मागे ती मुंबईत आली आणि २०११ साली फ्रीलान्स कोरिओग्राफर म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. या काळात तिला सलमान खान आणि कोरिओग्राफर थॉमस पॉलसन यांच्यासोबत काम करण्याची संधीही मिळाली.अभिनयाची आवड वाढल्यानंतर तिने बालाजी टेलिफिल्म्समध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली. ‘देखा एक ख्वाब’ या मालिकेतील ‘चक्की’ या भूमिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली होती.
मुंबईतील वास्तव्यात तिचा Anna Jaisinghani  इस्कॉनशी संपर्क आला आणि त्यानंतर तिच्या जीवनात मोठा बदल सुरू झाला. हळूहळू तिने मांसाहार, कांदा-लसूण आणि मद्यपान पूर्णपणे सोडले. भक्तिमार्ग स्वीकारल्यानंतर तिने सांगितले की श्रीकृष्णभक्तीमुळे तिच्या आयुष्यात स्थिरता आणि मानसिक शांतता मिळाली.अन्नाच्या म्हणण्यानुसार, तिला एकदा स्वप्नात प्रेमानंद जी महाराज यांचे दर्शन झाले आणि त्यांनी नामस्मरणाचा संदेश दिला. या अनुभवाचा तिच्यावर खोल परिणाम झाला. त्यानंतर ती वृंदावनात गेली आणि दीक्षा घेत पूर्णवेळ कृष्णभक्तीमध्ये स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.ग्लॅमरच्या जगातील प्रसिद्धी क्षणभंगुर असते, तर अध्यात्मातून मिळणारी शांती कायमस्वरूपी असते, असे ती मानते. ‘श्री नामाचा जप केल्याशिवाय जीवन अपूर्ण आहे,’ असे तिचे मत आहे. अभिनय क्षेत्रातील यशस्वी प्रवासानंतर अध्यात्माचा स्वीकार करणारी अन्ना जयसिंघानी आज अनेकांसाठी एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रवास ठरत आहे.