अमरावती/ मुंबई
Bacchu Kadu प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि विदर्भातील प्रभावी नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच त्यांना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे आयोजित भव्य जल्लोष सभेत बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे जोरदार कौतुक करत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केला. “सामान्य जनतेसाठी रात्री दोन वाजताही दरवाजा उघडा ठेवणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण जनतेसाठी धावून जाणारा असा नेता प्रथमच पाहिला आहे. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचे धाडस दाखवले. अशा नेत्याला पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असे विधान बच्चू कडूंनी केले.सभेत त्यांनी शिंदे सरकारच्या विविध निर्णयांचेही कौतुक केले. दिव्यांग, शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. “देशात इतर राज्यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवले. त्यांनी माणुसकीला प्राधान्य दिले, जात-धर्म पाहिला नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय भूमिकेबाबत बोलताना Bacchu Kadu बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, त्यांचा हा निर्णय केवळ सत्तेसाठी नसून तत्त्वाधिष्ठित आहे. “आम्ही हा भगवा सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी खांद्यावर घेतला आहे. आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या नेत्याला स्वीकारले आहे,” असे ते म्हणाले.दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर बच्चू कडूंनी घेतलेला हा निर्णय राजकीय पुनर्वसन म्हणून पाहिला जात आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर विदर्भातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाला त्यांच्या स्थानिक प्रभावाचा फायदा होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या प्रवेशानंतर प्रहार जनशक्ती संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहील, तर राजकीय कामकाज पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून केले जाईल, असेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे.