जबलपूर,
Bargi Dam boat accident मध्य प्रदेशातील जबलपूरजवळील बार्गी धरणातील क्रूझ बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा ११ वर पोहोचला असून शनिवारी संध्याकाळी दोन लहान मुलांचे मृतदेह सापडल्याने या दुर्घटनेने आणखी शोककळा पसरली आहे. बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू ठेवत विराज सोनी (६) आणि श्रितामिल राज (५) यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी बार्गी धरणाच्या जलाशयात घडली होती. मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या ‘मैकल सुत’ या क्रूझ बोटीने वादळी वाऱ्यांमुळे अचानक तोल गमावला आणि ती उलटली. त्या वेळी बोटीत सुमारे ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. यापैकी २८ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले, तर उर्वरित प्रवाशांसाठी शोधमोहीम राबवण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार, सापडलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह अपघातस्थळापासून काही अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळले. या घटनेत अजून काही जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), सेना आणि स्थानिक गोताखोरांची मदत घेतली जात आहे. खराब हवामानामुळे बचावकार्याला अधूनमधून अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही बचावलेल्या प्रवाशांनी लाइफ जॅकेट Bargi Dam boat accident वेळेवर उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, असा आरोप केला आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतरही बोट सेवा सुरू ठेवण्यात आल्याबाबतही चौकशीची मागणी होत आहे.
राज्य सरकारने या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून प्रशासनाकडून मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे पर्यटन सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.