बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव 44 हजार कोंबड्या नष्ट

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नंदुरबार
Bird flu नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असून, प्रभावित भागाची जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या कारवाईत सुमारे 44 हजार कोंबड्या आणि 39 हजार अंडी नष्ट करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 

Bird flu 
नवापूर परिसरातील काही कुक्कुटपालन फार्ममध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तपासणीत बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. संसर्गित फार्मच्या परिसरात प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून त्या भागातील कोंबड्यांचे निर्मूलन आणि अंड्यांची विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली.जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांची माहिती घेतली. त्यांनी कोंबड्यांचे निर्मूलन, निर्जंतुकीकरण आणि जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच परिसरात संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व आवश्यक उपाय तातडीने पूर्ण करण्याचे Bird flu निर्देशही देण्यात आले.दरम्यान, पशुसंवर्धन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त पथकांकडून बाधित परिसरात सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. संसर्गग्रस्त क्षेत्रात कुक्कुटपालनाशी संबंधित हालचालींवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेमुळे स्थानिक कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.