दहिसर-भाईंदर प्रकल्पात दुर्घटना; VJTI कडून चौकशी सुरू

    दिनांक :03-May-2026
Total Views |
मुंबई,
dahisar-bhayander-project-accident : मुंबईतील दहिसर-भाईंदर जोड मार्गाच्या कास्टिंग यार्डमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातात प्लॅटफॉर्म कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कामगारांच्या सुरक्षिततेबाबत काही त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
accident
 
 
या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुंबईतील ‘VJTI’ संस्थेच्या प्राध्यापकांचा एक तज्ज्ञ चमू नेमण्यात आला आहे. हा चमू लवकरात लवकर तपास करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई ठरवली जाईल. तसेच, कामगारांच्या सुरक्षिततेत कुठे त्रुटी राहिल्या असतील तर त्या ओळखून त्यावर उपाययोजना सुचवण्याचे कामही या टीमकडून केले जाणार आहे.
 
महानगरपालिका प्रशासनाने सांगितले की, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ठरवलेल्या नियमांचे पालन झाले होते का, याचीही तपासणी केली जाईल. जर कोणत्याही प्रकारचा नियमभंग आढळला, तर संबंधितांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.
 
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्यामुळे कामगारांच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यात येत आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही आणि ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम ठेवले जाईल.
 
याशिवाय, सर्व उंच संरचना, गॅन्ट्री, क्रेन्स आणि इतर यंत्रसामग्रीची तृतीय पक्षाकडून पुन्हा सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा तपासणी आणि लेखापरीक्षण नियमितपणे आणि काटेकोरपणे केले जाणार आहे.
 
किनारी रस्त्याच्या वेसावे ते भाईंदर या संपूर्ण प्रकल्पात कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम अधिक कडकपणे लागू केले जाणार आहेत. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेची मदत घेतली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून सर्व सुरक्षा प्रोटोकॉलची पुनर्तपासणी केली जाईल. कोणतीही त्रुटी आढळल्यास तात्काळ सुधारणा केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले आहे.