दिल्ली मेट्रोचा महास्फोटक विस्तार; ७ नव्या मार्गांना हिरवा कंदील

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi Metros दिल्लीत मेट्रो रेल्वे जाळ्याचा मोठा विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राजधानीतील वाढत्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन नव्या टप्प्यात सुमारे ९७ किलोमीटर लांबीचे सात मार्ग उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या विस्तारासाठी तब्बल ४८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असून, शहराच्या बाहेरील तसेच नव्याने विकसित होणाऱ्या भागांना सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
 
Delhi Metros
 
या नव्या योजनेत एकूण ६५ स्थानकांची उभारणी होणार आहे. सरकारने या सात मार्गांपैकी चार मार्गांना प्राधान्य देत त्यांच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्राधान्य मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा सुरू आहे. Delhi Metros राज्य सरकार आणि मेट्रो प्राधिकरण यांच्यातील चर्चेनंतर या योजनेला हिरवा कंदील मिळाला आहे. पुढील टप्प्यात आर्थिक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
 
या विस्तारामध्ये धंसा बस स्थानक ते नांगलोई, केंद्रीय सचिवालय ते किशनगड, समयपूर बदली ते नरेला, कीर्ती नगर ते पालम, जोर बाग ते मिठापूर, शास्त्री पार्क ते मयूर विहार टप्पा दोन तसेच केशवपुरम ते रोहिणी विभाग या सात मार्गांचा समावेश आहे. काही मार्ग पूर्णपणे उंच मार्गावर तर काही जमिनीखाली आणि जमिनीवर अशा मिश्र स्वरूपात उभारले जाणार आहेत. Delhi Metros या नव्या मेट्रो मार्गांमुळे दिल्लीतील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यावरणालाही याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.