एक्स्टॅसी रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटकेत

    दिनांक :03-May-2026
Total Views |
मुंबई,
ecstasy-racket-busted : मुंबईत विद्यार्थ्यांना एक्स्टॅसीसारखे पार्टी ड्रग्ज पुरवणाऱ्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश खेमलानी याला वनराई पोलिसांनी अटक केली. तो काही दिवसांपूर्वी देशाबाहेर पळून गेला होता, पण शुक्रवारी १ मे रोजी तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
 
 
 
ecstasy-racket-busted
 
 
नेस्को प्रदर्शन केंद्रात झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान मद्य आणि एक्स्टॅसीच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महेश खेमलानीवर संशय आल्याने तो मिरा रोडवरून थेट बँकॉकला पळून गेला. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी देशातील सर्व विमानतळांवर लूकआऊट नोटीस जारी केली होती.
 
शुक्रवारी सकाळी तो मुंबईत उतरल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले आणि लगेच वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
 
तपासात समोर आले की, महेश खेमलानी हा आयात-निर्यात व्यवसाय करत होता आणि त्याचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला असून त्याच्याकडे तेथील नागरिकत्व आहे. त्याने काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक्स्टॅसीचा साठा विक्रीसाठी पुरवला होता. आयुष साहित्य, शुभ अग्रवाल, विनीत गिरेलानी यांसारख्या विद्यार्थ्यांना त्याने ड्रग्ज दिले आणि विक्रीतून मिळणारी रक्कम त्याच्या प्रेयसी जिया जेकबच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले होते.
 
आर्थिक तपासात जिया जेकबच्या खात्यावर सुमारे ५० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जियानेही चौकशीत हे व्यवहार महेशच्या सांगण्यावरूनच झाले असल्याचे कबूल केले आहे.
 
आता पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. महेश खेमलानीने हे ड्रग्ज कुठून आणले, त्यामागे कोणते मोठे जाळे आहे का, त्याने स्वतःच उत्पादन केले का, तसेच भारतातील कोणकोणत्या शहरांमध्ये त्याने ड्रग्ज पुरवले, याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.