गुरुग्राम
Gurugram shooting गुरुग्राम, सायबर सिटीतील सेक्टर 40 परिसरात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक राहुल फाजिलपुरिया यांच्या इव्हेंटचे आयोजक सौरभ यादव यांना लक्ष्य करून दोन अज्ञात बाइकस्वारांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सौरभ यादव यांच्या सुरक्षेत तैनात असलेले पोलिस कर्मचारी कुलविंदर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीवरून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी सौरभ यादव यांच्या घराबाहेर प्रथम हवेत गोळीबार केला. त्या आवाजाने सुरक्षा कर्मचारी कुलविंदर बाहेर आले आणि त्यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी शस्त्र उचलले. त्याच वेळी हल्लेखोरांनी थेट त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात कुलविंदर यांना दोन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
घटनेच्या वेळी Gurugram shooting, सौरभ यादव हे घराच्या पहिल्या मजल्यावर उपस्थित होते, त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले कुलविंदर गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विदेशात बसलेल्या एका कुख्यात गँगस्टरकडून सौरभ यादव यांना पूर्वीपासून धमक्या मिळत होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचारीही देण्यात आले होते.पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.या घटनेमुळे गुरुग्राम शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील तपासात हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख स्पष्ट होण्याची शक्यता आहे.