वर्धा,
boer-tiger-project : अंधारात जंगलातील किर्रर्र आवाज, जंगलातील काळोखाला भेदणारा चंद्राचा प्रकाश, पाणवठ्यांशेजारील मचाणीवर रात्र जागणार्यांच्या कानावर पडणारा पक्ष्यांचा आवाज अन् धडकी भरवणारी वाघाची डरकाळी, हा अनुभव यंदा बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग अनुभव दरम्यान पर्यटकांना आला. विशेष म्हणजे, यंदाच्या निसर्ग अनुभवादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील भुलाई डोहमध्ये वाघाची डरकाळी तर बफर क्षेत्रात बिबट्याने केलेल्या शिकारीचा थरार पर्यटकांना पाहायला मिळाला.
बोर व्याघ्र प्रकल्पात १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. १ रोजी सोडत पद्धतीने मचाणी निश्चित करून पर्यटकांना मचाणींवर वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसविण्यात आले होते. जंगलात अंधार पसरला. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात काही पर्यटकांना अस्वल, बिबट, सांबर, हरिण, मोर आदी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले.
कोअर व बफर क्षेत्रातील ४४ मचाणींवर रात्रभर जागून लुटला. बोरधरण भागातील मचाणींवर २४, न्यू बोर मध्ये १७, हिंगणी क्षेत्रात १२, बांगडापूर १६ तर कवडस भागातील मचाणींवर ५ पर्यटकांनी निसर्ग अनुभवात सहभाग घेतला.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग अनुभवात सहभागी होण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. जंगल आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रीया पर्यटक डॉ. अमोल चाफले यांनी दिली. तर नागपूर येथील दिनेश हिरुडमर यांनी, मी माझ्या मुलासह निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी झालो असल्याचे सांगत हा निसर्ग अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी सांबर, नीलगाय यासह अस्वलीचे दर्शन आम्हाला झाल्याचे त्यांनी सांगितले.