मध्य प्रदेश
Indore police accident मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोलिस विभागालाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे. रात्रीच्या गस्तीदरम्यान ड्युटीवर असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना एका मद्यधुंद पोलिसाने स्वतःच्या कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजनगर परिसरात रात्री गस्त घालत असताना कॉन्स्टेबल प्रमोद त्यागी आणि भूरलाल यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणातील आरोपी चालकाची ओळख डीआरपी लाईनमधील पोलिस कर्मचारी विजय चौहान अशी झाली आहे. घटनेच्या वेळी तो मद्याच्या नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नशेमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातात Indore police accident आरोपी चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर चोइथराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू आहेत. अपघातातील कार जप्त करण्यात आली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.या घटनेनंतर पोलिस विभागात मोठी हालचाल सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आरोपी पोलिस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, नागरिकांसह सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.