तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Karmayogi award स्वातंत्र्यप्राप्तीला अनेक दशके उलटून गेल्यानंतरही विकासापासून वंचित राहिलेला पारधी समाज तसेच नापिकी, कर्जबाजारीपण इ. मुळे त्रस्त शेतकरी बांधवांच्या उत्थानासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेल्या कार्याकरिता यवतमाळच्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला लक्ष्मणराव मानकर संस्थेचा ‘कर्मयोगी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, खासदार माया इवनाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाल, सोनचाफ्याची परडी, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि 2 लक्ष रुपयांचा धनादेश या स्वरूपातील हा पुरस्कार मुंबईच्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या शानदार समारंभात संस्थेचे सचिव विजय कद्रे, सहसचिव विवेक कवठेकर, कोषाध्यक्ष धनंजय चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी हा स्वीकारला. तत्पूर्वी संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारा माहितीपट दाखविण्यात आला.
समाजातील वंचित शोषित आणि दुर्गम भागात राहणाèया बांधवांची सेवा करणे ही त्यांच्यावर केलेली दया किंवा उपकार नसून ते आपले आद्य कर्तव्य आहे. ‘शिवभावे जीवसेवा’ हाच भारताचा मूळ स्वभाव आहे. ही सेवा आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या कामाबद्दल माहिती देऊन त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा व दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय संकल्पना असल्याचे सांगितले.याप्रसंगी मानकर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी प्रास्ताविक तर सचिव प्रशांत बोपर्डीकर यांनी आभार मानले. मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री हंसराज अहिर, अभिनेते सुनील शेट्टी, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांताध्यक्ष कांचन गडकरी, नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्यासह विविध क्षेत्रांतील गणमान्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले. अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत, तर यामिनी पायघन यांनी पसायदान सादर केले.