नसरापूर,
nasrapur-case : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत गंभीर घटनेनंतर आता या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आरोपीला कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी पीडित चिमुरडीच्या आईवडिलांना आणि नातेवाईकांना दिल्यानंतर नवले पुलावरील आंदोलन शांत झाले. सुरुवातीला चिमुरडीला न्याय मिळावा या मागणीसाठी कुटुंबीय आणि नागरिकांनी जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर सुमारे चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले आणि त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, काही जणांनी आंदोलन अधिक चिघळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन मोडण्यासाठी बळाचा वापर केलेला नाही, तर फक्त परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली.
यानंतर रात्री उशिरा चिमुरडीवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि शेवटी परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला घटनेनंतर अवघ्या दीड तासात अटक करण्यात आली होती. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपीविरोधात गंभीर गुन्ह्यांचे जुने संदर्भही समोर आले आहेत. त्याच्यावर पोक्सो कायद्याखाली आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणात जलद न्याय मिळावा यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारतर्फे सक्षम सरकारी वकील नेमून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.