शिस्तीच्या चौकटीत ‘नीट’ परीक्षा यशस्वी

- विद्यार्थ्यांनी घेतला मोकळा श्वास

    दिनांक :03-May-2026
Total Views |
नागपूर,
neet-exam : नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयाेजित ‘नीट’ परीक्षा रविवार दिनांक ३ मे रोजी अतिशय शांततेत पार पडली. नागपूर विभागातील १० ते १२ हजार विद्यार्थ्यांनी शहरातील ६४ केंद्रांवर परीक्षा दिली.
 
 
 
NEET
 
 
परीक्षेपूर्वी सकाळी ११ ते दुपारी १:३० या वेळेत विद्यार्थ्यांना केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. कडक सुरक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश देण्यात आला. ओळखपत्र, प्रवेशपत्र आणि छायाचित्र यांची काटेकोर तपासणी करण्यात आली.
 
दुपारी २ वाजता सुरू झालेली परीक्षा सायंकाळी ५ वाजता संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसून आला. यंदाची परीक्षा गेल्या वर्षीच्या तुलनेत सोपी झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मात्र भौतिकशास्त्र विषयाने विद्यार्थ्यांची चांगलीच कसोटी पाहिली. या विषयातील सुमारे ७० टक्के प्रश्न संख्यात्मक आणि संकल्पनांवर आधारित असल्याने वेळ अधिक लागल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
याउलट जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयातील प्रश्न तुलनेने सोपे असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. हे दोन्ही विषय गुण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. यामुळे यंदा निकालाचा टक्का वाढण्याची शक्यता असून गुणमर्यादा वाढण्याचाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
नियम व परीक्षेची रूपरेषा
 
 
नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांनी गैरप्रकार रोखण्यासाठी कडक नियम लागू केले. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी, ठराविक पोशाख आणि काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रवेशपत्रासोबत पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र व ओळखपत्र अनिवार्य होते. प्रवेशापूर्वी जैवमितीय उपस्थिती घेण्यात आली. परीक्षा लेखी पद्धतीने घेण्यात आली. एकूण ७२० गुणांच्या परीक्षेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र प्रत्येकी १८० गुणांचे, तर जीवशास्त्र ३६० गुणांचे प्रश्न विचारले गेले. परीक्षा विविध ११ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आली.
 
नियम न पाळल्याने विद्यार्थी अडचणीत
 
कडक नियमांमुळे काही विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. धनवटे महाविद्यालयाच्या केंद्रावर एका विद्यार्थ्याला आधारकार्ड नसल्याने प्रवेश नाकारण्यात आला, तर दुसऱ्याला आवश्यक छायाचित्र नसल्याने परतावे लागले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर एका विद्यार्थिनीला काही मिनिटांचा उशीर झाल्यामुळे परीक्षा देता आली नाही. एकूणच कडक नियम, काटेकोर अंमलबजावणी आणि सुरळीत नियोजनामुळे परीक्षा शांततेत पार पडली.