ओडिशा
dahi vada poisoning ओडिशा राज्यातील जाजपूर जिल्ह्यातील एका गावातून अन्न विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. दशरथपूर ब्लॉकमधील पातापूर गावात स्थानिक विक्रेत्याकडून दहीवडा खाल्ल्यानंतर तब्बल ५८ जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितांमध्ये २७ लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गावातील एका विक्रेत्याकडून दहीवडा खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलटी, ताप आणि अशक्तपणाची लक्षणे दिसू लागली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच सर्वांना तातडीने जवळच्या दशरथपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात तसेच जाजपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केल्याने अनेक रुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.जाजपूरचे जिल्हाधिकारी अंबर कुमार यांनी सांगितले की, रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत असून आतापर्यंत २१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित रुग्णांवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग यांनी जाजपूर येथील रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. प्राथमिक तपासात दहीवडा सेवनामुळेच ही अन्न विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अन्नपदार्थ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सखोल चौकशीसाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.दरम्यान, स्थानिक खासदार रबींद्र नारायण बेहरा यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात एका सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असला तरी त्या रुग्णालयात दाखल झाल्या नव्हत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत निश्चित माहिती मिळेल.उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील अन्नपदार्थ सेवन करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेनंतर अन्न सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित विक्रेत्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.