मंगरूळनाथ,
Praveen Mendre तालुक्यातील दाभा येथील रहिवासी प्रवीण विलास मेंद्रे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण दाभा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवीण मेंद्रे यांचा गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सत्कार करण्यात आला.
सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रवीण यांनी अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. पहाटे उठून अभ्यास, शेतात काम आणि स्पर्धा परीक्षेची तयारी असा दिनक्रम त्यांनी सुरू ठेवला होता. Praveen Mendre त्यांच्या या जिद्द आणि मेहनतीचे फळ म्हणून आज ते पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान झाले आहेत. प्रवीणने गावाचे नाव उंचावले आहे. त्याच्या यशाने तरुण पिढीला नवी प्रेरणा मिळाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द सोडली नाही तर यश निश्चित मिळते, हे त्याने दाखवून दिले, अशी भावना ग्रामस्थांनी व विद्यमान सरपंच यांनी व्यक्त केली.
पोलिस दलात भरती होऊन समाजाची सेवा करण्याची इच्छा प्रवीण यांनी व्यक्त केली आहे. गावकर्यांचे प्रेम आणि आई-वडिलांचे आशीर्वाद यामुळेच हे यश मिळाले. Praveen Mendre कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेन, असे प्रवीण मेंद्रे यांनी सांगितले. सध्या प्रवीण यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रपरिवाराची गर्दी होत आहे. गावात पेढे वाटून आनंद साजरा केला जात आहे.