पुणे,
Pune Bhor Narsapur पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामधील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या Pune Bhor Narsapur भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच पीडित चिमुकलीच्या वडिलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अस्थी विसर्जनाच्या वेळी पित्याचा संताप
पीडित मुलीचे वडील आपल्या चिमुरडीच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी देहू आणि आळंदी येथे गेले होते. विसर्जनाचे विधी सुरू असतानाच त्यांना घरी अनेक राजकीय नेते सांत्वनासाठी येत असल्याची माहिती मिळाली. ही बातमी ऐकताच पित्याचा संयम सुटला. त्यानंतर त्यांनी अस्थी विसर्जन केल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी अत्यंत भावूक होऊन सर्व राजकारण्यांना हात जोडून एक विनंती केली.
मी माझ्या मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी बाहेर असताना मला घरून फोन आले की अनेक राजकारणी सांत्वन करण्यासाठी येत आहेत. पण माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे की जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटायला आमच्या घरी येऊ नये, ही आमची नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोणी लोकं असतील, ज्यांना आम्हाला भेटायचं असेल आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकारण्यांनी माझ्या घरी माझे सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे, असे पीडित मुलीचे वडील म्हणाले.
नेमकी घटना काय?
भोर तालुक्यातील नरसापूर Pune Bhor Narsapur परिसरात एका ६५ वर्षीय नराधमाने ओळखीचा फायदा घेत एका ४ वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्या नराधमाने त्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम कुटुंबाच्या ओळखीचाच असल्याने परिसरातून अधिक संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी गृहविभागावर जोरदार टीका करत आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली आहे. पीडित पित्याच्या या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात शांतता पसरली असून, त्यांच्या शब्दांनी समाजातील संवेदनशील घटकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर पोक्सो (POCSO) आणि खुनाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी जोर धरत आहे.