पुणे
Pune Bhor taluka crime पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि तिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यासह देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे–बंगळुरू महामार्गावर नागरिकांनी काही काळ रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असून यावेळी बळाचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ भोर तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी नागरिकांनी शांततेत आपला निषेध नोंदवत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, काही ठिकाणी आंदोलनात असामाजिक घटक घुसल्याचा आरोपही करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत सरकार आरोपीला मृत्युदंड मिळवून देण्यासाठी सर्व कायदेशीर उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, “मी स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोनदा बोललो असून आरोपीविरुद्ध फास्टट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया राबवली जात आहे. दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करून खटला जलदगतीने चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
फडणवीस यांनी पुढे Pune Bhor taluka crime सांगितले की, लोकभावनेनुसार अशा आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी सर्वांचीच इच्छा आहे, मात्र लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीतच कारवाई करावी लागते. “कायद्यातील कोणतेही पळवाट शिल्लक राहू नये याची काळजी घेऊन आरोपीला मृत्युदंड मिळावा यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनादरम्यान काही जण परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाने शांतता राखण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून प्रशासनाने त्यांचे संरक्षण केले आहे. “काही लोकांनी त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र अशा घटकांची ओळख पटली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण कायम असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.