हिट है भाई 'राजा शिवाजी'

    दिनांक :03-May-2026
Total Views |
मुंबई
Raja Shivaji movie रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराजांच्या जीवनातील संघर्ष, युद्धनीती आणि स्वराज्य स्थापनेचा थरार मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे सादर करण्यात आल्याने चित्रपट चर्चेत आला आहे.
 

Raja Shivaji movie 
या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन यांसारख्या कलाकारांच्या सहभागामुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. तर अजय-अतुल या संगीतकार जोडीने दिलेल्या संगीतामुळे चित्रपटातील भावनिक आणि युद्धदृश्यांना अधिक प्रभावीपणा लाभला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी चित्रपटाचे विशेष कौतुक करताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याचा लढा उभा केला आणि त्याच संघर्षाची भव्य मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे. त्यांनी चित्रपटातील युद्धदृश्ये, भावनिक प्रसंग आणि महाराजांचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे साकारण्यात आल्याचे नमूद केले.
रोहित पवार यांनी पुढे लिहिले की, Raja Shivaji movie  हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून इतिहासाचा जिवंत अनुभव देणारा आहे. त्यांनी प्रेक्षकांना आवाहन करत चित्रपटगृहांमध्ये जाऊन ‘राजा शिवाजी’ नक्की पाहावा, असेही सांगितले. महाराजांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आजच्या काळातही समाजासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ११.३५ कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने दमदार ओपनिंग केली, तर दुसऱ्या दिवशी १०.५५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत एकूण २१.९० कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान, याच कालावधीत प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांशी स्पर्धा असूनही ‘राजा शिवाजी’ने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.
ऐतिहासिक भव्यता, तगडी स्टारकास्ट आणि भावनिक मांडणी यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत असून, पुढील दिवसांत त्याची कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.