वर्धा,
pankaj-bhoyar : जनगणनेचा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर झाला असून दोन टप्प्यात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना, तर दुसर्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिल्या टप्पा सुरू होण्यापूर्वी १ में १५ में पर्यंत स्वगणना केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रथम स्वतःची संपूर्ण माहिती अपलोड करून नागरिकांनीही या जनगणनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पत्र परिषदेतून केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र दिनी जनगणनेची माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ आदी उपस्थित होते.
देशातील ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यामध्ये मोबाइलच्या माध्यमातून प्रत्येक व्यतीला स्वतः माहिती भरायची असल्याने प्रत्येकाचा सहभाग असणार आहे. या राष्ट्रीय कार्यामध्ये सर्वांनी सहकार्य करून जनगणनेच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या अभियानाकरिता २ हजार २०२ प्रगणकांची करण्यात आली असून या कामाकरिता १० शहरी चार्ज अधिकारी, ८ ग्रामीण चार्ज अधिकारी नियुक्त केले आहेत. सोबतच २० जिल्हास्तरीय चार्ज अधिकारी, २ मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २ हजार २०२ प्रगणक, ३६८ पर्यवेक्षक व २० तांत्रिक सहायकांना प्रशिक्षण देण्यात आले. एका प्रगणकाकडे १८० घरे किंवा ८०० लोकसंख्येची जबाबदारी देण्यात आली असून या प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
स्वगणनेच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच जनगणनेच्या कामात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांनी भेट देऊन आपली माहिती भरायची आहे. १६ मे ते १४ जून या कालावधीत दुसरा टप्पा सुरू होणार आहे. या दुसर्या टप्प्यामध्ये प्रगणक घरभेटीला आल्यावर आपल्या आयडीद्वारे संपूर्ण माहिती तपासणार आहे. तेव्हा अचूक माहिती अपडेट केली आणार आहे. ज्यांनी माहिती भरली नसेल त्यांच्याकरिता प्रगणक सहकार्य करणार आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी. सी. यांनी सांगितले.