बिहार,
encounter बिहारमधील सीवान जिल्ह्यातील बहुचर्चित हर्ष सिंह हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी सोनू यादव याला रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत ठार केले. हुसैनगंज परिसरातील सरैया गावात ही चकमक झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी सीवानमध्ये झालेल्या एका किरकोळ वादातून भाजपचे माजी आमदार मनोज सिंह यांचे भाचे हर्ष सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. आंदर ढाला उड्डाणपुलाजवळ झालेल्या या घटनेत हर्ष सिंह यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे वडील गंभीर जखमी झाले होते. गाडीच्या किरकोळ धक्क्याच्या वादातून हा वाद सुरू झाला होता, जो नंतर हिंसक रूपात परिवर्तित झाला.या हल्ल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यात आरोपी गोळीबार करताना दिसत होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सोनू यादव याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी वापरलेली कार जप्त केली असून, कारचा चालक सुनील यादव यालाही अटक करण्यात आली आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील encounter आणखी एक आरोपी छोटू यादव याला यापूर्वी झालेल्या चकमकीत जखमी अवस्थेत पकडण्यात आले होते. पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींचा शोध सुरूच असल्याचे स्पष्ट केले असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.बिहार पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याचे सांगत, गुन्हेगारांविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहील आणि कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.